Posts Tagged ‘marathi songs’

जीवन……. एक अग्नीकुंड!

फेब्रुवारी 24, 2008

जीवन…….
एक अग्नीकुंड-
भकभकतं ।
त्यातील ज्वाळा…..
पहातात सगळ्यांना
गिळायची वाट ।

असतात संबधी अडचणीच्या.
असलेल्या प्रत्येकास,
टाकाव्या लागतात समिधा तिच्यात
इच्छेच्या, अकांक्षेच्या, स्वप्नांच्या !

आणि समिधाच संपल्या तर…..?
स्वत:च बनून समिधा…..
घ्यावी लागते उडी-
त्या नरभक्षक अग्नीकुंडात ।

जीवन…..
एक अग्नीकुंड-
ज्याने जळतही नाही पुर्ण!
तसच पोळलेलं, लक्तरलेलं शरीर घेऊन,
जळत-जळत जगावं लागतं….
मरेपर्यंत ।

- © प्रशेन ह. क्यावल
http://prashengazal.blogspot.com

मुंबई

फेब्रुवारी 24, 2008

छोट्या छोट्या माण‍सांची
छोटी छोटी मुंबई ।

मोठ्या मोठ्या मुंबईतील,
मोठी मोठी घरे ।

मोठ्या मोठ्या घरातील,
छोटी छोटी गाळे ।

छोट्या छोट्‍या गाळ्यातील,
छोटी छोटी माणसे ।

छोट्या छोट्या माणसांचे,
छोटे छोटे जीवन ।

छोट्या छोट्या जीवनातील,
रोजरोजचं मरण ।

छोट्या छोट्या माणसांचे,
छोटे छोटे मरण ।

छोट्याशाच स्मशानात,
छोटे जळते सरण।

- © प्रशेन ह. क्यावल
http://prashengazal.blogspot.com

अध्यात्माच्या हिंदोळ्यावर

फेब्रुवारी 24, 2008

अज्ञाताच्या पलीकडील, चंद्रलता मज खुणाविते।
मंद प्रकाशी किरणसखी ती, मज जवळ यावया डिवचते॥
झपाटून त्या गुढस्पर्शाने, झर्रकन मी पुढे सरसावतो।
मायेचे कुंपण काटेरी, बाजू सारण्या स्पर्शतो॥
वास्तवतेचा प्रचंड थरार, थरकापून मी मागे होतो।
झपूर्झत्वाचे ज्ञान नाहीसे, अज्ञानात मी पुन्हा नहातो॥
त्रिशंकू ही स्थिती मनाची, कसा बरे मी बाजूस सारू?
कसा जगू? मी कसा जगू?

तपास मझ्या भंग करण्या, मायामेनका नाच करते।
अद्वैतओढी पतंगाची या, पुन्हा पुन्हा डोर मागे खेचते॥
अथांग सागर मेघ बनूनी, असाच कधीतरी बरसतो।
तो मोत्यांचा पाऊस मी, चातकचोचीने पीऊ पहातो॥
येता येता चोचित मोती, मध्येच का मग मेघ आटतो।
तुष्णाकित चातक बिचारा, आशाळभूत पुन्हा तसाच बघतो॥
झेपावणाय्रा मनाचे या, घरट्यामधेच का प्राणपाखरु?
कसा जगू, मी कसा जगू?

अशीच कितीदा वीज चकाकते, आलिंगन द्यावया हात देते।
रसरसलेल्या इंद्रधनूतून, गूढ ध्वनीने बोलाविते॥
कसला अमानुष सुगंध फेरुनी, मज पाशात ती आवळते,
मीही तसाच आवेगाने अभावित पुढे सरसावतो।
मदनाच्या आवेगाने त्या अज्ञातरतिला मिठी मारतो॥
पण का मध्येच सारे जलबिंदू, होती जळजळीत अग्नीफुले?
विरून जाते आग सर्व ती, राख बनून मी वापस येतो॥
ना ओला ना सुकलेला मी, ग्रिष्म पावसात कसा जळू?
कसा जगू? मी कसा जगू?

अध्यात्माच्या वेळुबनातूनी, शीळ फुंकित वारा येतो।
स्वरलहरींच्या नादासरशी, मज कसलातरी संदेश देतो॥
नदीचाही अवखळ निर्झर, खळबळ मनात उठवून देतो।
वहीवाटेवर उगमाकडच्या खुणेनेच मज जावया सांगतो।।
मीही भराभर धावत सुटतो, कैलासाचे शिखर गाठतो।
हिमशिखरे बघूनी ऊंचऊंच ती, मनातल्या मनी मी हर्षतो॥
पुन्हा खेळी ती कशी जीवघेणी, कुणितरी मजसंगे खेळतो।
क्षणात पुन्हा नदीकाठी मी, स्वत:च मग एक प्रश्न बनतो।।
पिकलेले हे पान मनाचे, वय्रासरशी किती हलू?
कसा जगू? मी कसा जगू?

असाच कितीदा शिखर गाठूनी, क्षणांत का मी तळास जातो?
कधी बसूनी विचार करतो, त्यासच कधी मी भाग्य मानतो।
पण तगमग तरी ती संपत नाही, त्रुष्णा कधीच भागत नाही।
झपाटूनी मी पुन्हा-पुन्हा, वाळवंटी असाच सागर शोधितो।।
कसे बरे हे संपवू सारे, मध्येच पुन्हा मी विचार करतो।
शिखंडी ही बनत नाही, कधी प्रक्रूती, कधी प्रव्रूत्ती बनतो॥
असेच होते पुन्हा-पुन्हा अन् असाच मी झुरून मरतो।
ना पोहतो कधी तरंगासवे अन् कधीच ना मी तळास जातो॥
असाच दिवस अन् रात्र बनुनी, जीवनभर मी कसा राहु?
कसा जगू? मी कसा जगू?

— Copyright with Prashen H Kyawal
http://prashengazal.blogspot.com

संपुर्ण समर्पण

फेब्रुवारी 24, 2008

ये सखे मज लिपटुन जा,
तुझे सर्वस्व मज देऊन जा।
रस माझ्या ओठांचा ओठांनी शोषूनी,
मज प्रेमात चिंब भिजवून जा।

तुझे रोम-रोम होऊ दे रोमांचीत,
होऊ दे तुझ्या सर्व व्रूत्तींना पुलकीत,
तोडूनी बंध सारे मला घट्ट बिलगीत,
तू हलकेच माझ्यात मिसळून जा।

होऊ दे स्पर्श माझा तुझ्या सर्वांगाला,
भेटू दे श्वास माझा तुझ्या श्वासाला,
घर्षू दे माझे शरीर तुझ्या शरीराला,
मज कामशास्र तू शिकवून जा।

उमटू दे चुंबनांचे ठसे सर्वांगावर,
नसू दे वस्त्रांचा ताबा शरीरावर,
तुझे अनाव्रुत्त शरीर माझ्या शरीरावर,
हळूवार तू झोकून जा।

जे न जाणी बंध, म्हणती त्यास प्रेम,
उधळे बेफाम जे, म्हणती त्यास प्रेम।
संपुर्ण समर्पण!…. नाव त्याचेच प्रेम,
पाठ प्रेमाचे मजकडून शिकून जा।

— copyright with Prashen H Kyawal

http://marathipoems.wordpress.com